गावठी कट्ट्यांची विक्री करणारे अटकेत

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : गावठी कट्ट्यांची विक्री आणि खरेदी करणार्‍या दोघांना ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. १९) छत्रपती संभाजीनगर ते जालना रस्त्यावर हिरापूर शिवारात करण्यात आली. बाबासाहेब रामराव ऊर्फ रामभाऊ मिसाळ (वय ३०, रा. जानेफळ दाभाडी, जि. जालना) असे संशयित आरोपीचे तर रईस खान अजिम खान पठाण (रा. गल्ली नं. ९, हुसेन कॉलनी, पुंडलिकनगर) असे खरेदीदाराराचे नाव आहे.
या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादविरोधी शाखेचे पथक गस्तीवर असताना छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडने एक संशयित गावठी कट्टा विक्रीसाठी मिसाळ जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून एपीआय गोरे यांनी पथकासह हिरापूर शिवारात सापळा रचला. संशयित मिसाळ हा दुचाकीवरून जाताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याजवळ एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस (राऊंड) आढळून आले. त्याची चौकशी केली असता, आणखी एक कट्टा व दोन काडतुसे शहरातील रईस खान याला विक्री केल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिस रईस खानच्या मागावर गेले असता त्याला झाल्टा फाटा परिसरातून अटक करण्यात आली. रईसच्या ताब्यातून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी काडतुसांसह गावठी कट्टे जप्त केले. ही कारवाई सहायक निरीक्षक दिनकर गोरे, उपनिरीक्षक मनोहर खंडागळे, विक्रम देशमुख, श्रीमंत भालेराव, संजय घुगे, राजेंद्र डकले, वाल्मीक निकम, गणेश कोरडे यांच्या पथकाने केली.